Sharad Pawar – शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच अजित पवार गटासोबत गेलेल्या सर्व आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केली असेही उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर युक्तिवाद सुरू आहे. त्यावेळी अजित पवार गटाच्या वतीने जयंत पाटील यांची उलटसाक्ष घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अजित पवारांच्या वकिलांकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यावर जयंत पाटील म्हणाले, मी प्रदेश अध्यक्ष पदावर होतो. निवडणूक झाली आणि माझी निवड झाली. 2019 पासून मी या पदावर आहे. त्याआधी 2018 साली माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 2022 साली विविध जिल्ह्यांमध्ये आणि राज्यात निवडणुका पार पडल्या. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांनी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली.
2018 साली निवडणूक झाली, त्यात माझी राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली होती. 2022 मध्ये राज्य पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्यात काही जिल्ह्यातील पदाधिकारी निवड झाली तर काही जिल्ह्यात ती सुरू होती. राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
राष्ट्रीय निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर दिल्लीत नॅशनल कन्व्हेन्शन पार पडली. त्यात शरद पवार यांना कार्यालय निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले. इतर राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मला माहिती नाही, पण माझ्या निवडीचे पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मला मिळाले होते.