हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच – रामदेवबाबा

राम मंदिर बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

नांदेड – श्रीराम हे प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत. ते हिंदूंचे आणि मुस्लिमांचेही पूर्वज आहेत. मुस्लीम बांधव सौदी अरबमधून आलेले नाहीत. ते आपलेच बांधव आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच आहेत. त्यामुळे राम मंदिर बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, असे रामदेव बाबा म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ते नांदेडमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राम मंदिर हा भारतीय जनतेच्या श्रद्धेचा प्रश्‍न आहे. तो कोणताही राजकीय प्रश्‍न नाही. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. राम मंदिर अयोध्येत उभारावे, अशी आमची श्रद्धा आहे. राम मंदिर हे आम्ही मक्केत किंवा व्हॅटीकनसिटीमध्ये बांधा असे म्हणत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

राम मंदिर उभारणीसाठी आता कोर्टात वाद सुरू आहे. यासाठी मध्यस्थांची नियुक्‍ती केली आहे. मात्र त्यांच्याकडून काही होईल असे वाटत नाही. त्यामुळे एकतर केंद्र सरकारने यासाठी लवकरात लवकर कायदा करावा अन्यथा लोकांनी स्वतःहून राम मंदिर बांधायला, सुरुवात करावी असे दोनच पर्याय आहेत, असे त्यानी यावेळी सुचविले.

Leave A Reply

Your email address will not be published.