गांधीनगर – भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची आस्था आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी खूप काही केले आहे. अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराचे श्रेयही त्यांना दिले गेले पाहिजे अशी भावना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केली आहे.
पटेल म्हणाले की अयोध्येत राम मंदिर व्हावे याकरता उत्तर प्रदेशात अनेक आंदोलने झाली. आता तेथे एक विशाल मंदिर बांधले जात आहे. मंदिरासाठी किती आंदोलने झाली याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. आता तेच मंदिर 2024 पर्यंत तयार होणार आहे.
विश्व उमियाधामतर्फे निकाल भागात आयोजित करण्यात आलेल्या राम कथा कार्यक्रमात पटेल बोलत होते.
यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विश्व उमियाधाम एक भव्य मंदिर परिसर असून तब्बल 1 हजार कोटी रूपये खर्च करून अहमदाबादजवळ जसपूर गावात त्याची स्थापना करण्यात आली आहे. पटेल समुदायातील उपसमुदाय कडवा पटेलांची कुलदेवी उमिया मातेला हे मंदिर समर्पित केले जाणार आहे. 504 फूट उंचीचे हे मंदिर जगातील सगळ्यांत उंच मंदीर असेल असे विश्व उमिया फाऊंडेशनने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019 मध्ये या मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती.