नवी दिल्ली –कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यामुळे कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मिळणारा राजकीय पाठिंबा वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलन सुरू केले आहे. सिंह हे भाजपचे खासदार असल्याने त्या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत.
प्रियंका आणि केजरीवाल यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखीच वाढण्याची शक्यता बळावली आहे. आंदोलक कुस्तीपटूंचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर प्रियंका यांनी पत्रकारांशी बोलताना सिंह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, विरोधक पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करत आहेत. भाजप ब्रिजभुषण सिंहला पाठिशी घालत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत सापडले आहेत. भाजप आता यावर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिंह कुस्तीपटूंवर दबाव टाकू शकतात. तसेच, कुस्तीपटूंच्या कारकिर्दीत अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे त्यांना पदावरून हटवले जावे, अशी मागणी प्रियंका यांनी केली. केंद्र सरकार सिंह यांचा बचाव करत आहे. मोदींकडून मी कुठलीही अपेक्षा करत नाही. कारण, त्यांना कुस्तीपटूंची चिंता असती तर त्यांना चर्चेसाठी बोलावले गेले असते. पदके मिळवल्यावर मोदी खेळाडूंना चहापानासाठी बोलावतात. त्याप्रमाणे आताही त्यांनी आंदोलक कुस्तीपटूंना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे प्रियंका यांनी म्हटले.
जंतर-मंतर परिसरात रजा घेऊन दाखल व्हा
देशावर प्रेम असणाऱ्या प्रत्येक भारतीयाने आंदोलक कुस्तीपटूंच्या पाठिशी उभे रहावे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रजा घेऊन देशभरातून जंतर-मंतर परिसरात दाखल व्हावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. चुकीचे कृत्य केले तरी एका राजकीय पक्षाच्या नेत्यांचे कुठलेच नुकसान होत नाही. येथे तेच घडत आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.