पुणे – एका 13 वर्षीय मुलाने दोन मुलांना घरात खेळण्याच्या बहाण्याने बोलवून घेत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वारजे परिसरातील गोसावी वस्ती येथे घडला. याप्रकरणी पीडित मुलांच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठत, आरोपीविरुद्ध तक्रार दिली आहे.
पीडित मुलांच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा आठ वर्षांचा मुलगा त्याच्या सहा वर्षीय मित्रासोबत घराबाहेर खेळत होता. त्यावेळी 13 वर्षाच्या मुलाने या दोघांना स्वत:च्या घरात खेळण्यासाठी बोलावले. मुले त्याच्या घरी खेळण्यासाठी गेले असता, त्याने एका मुलाला विवस्त्र केले. तर दुसऱ्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केले. संबंधित मुले घरी गेल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार पालकांना सांगितला.
याबाबत पालकांनी आरोपी मुलाकडे जाऊन खातरजमा केली असता, सदर मुलाने असा प्रकार केल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाणे गाठत अल्पवयीन मुलाविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.