Ram Mandir : सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. यावेळी सगळीकडे राम भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचं चित्र दिसून आलं. संपूर्ण देश राम भक्तीत तल्लीन झाला होता.
मात्र, दुसरीकडे 22 जानेवारीलाच आपली डिलीव्हरी व्हावी असा अनेक गर्भवती महिलांनी हट्ट धरला असल्याचं आपण पाहिलं होत. यासाठी अनेक कुटुंबांनी शस्त्रक्रियेची तारीख 22 जानेवारी निश्चित केली होती. या संदर्भातील अनेक बातम्या आणि व्हिडिओ देखील समोर येत होते.
सरकारी हॉस्पिटल्समध्ये दररोज किमान पाच ते 10 गर्भवती महिला या 22 जानेवारीला सिझेरियन (सीझर ऑपरेशन) डिलीव्हरीसाठी डॉक्टरांशी सल्लामसलत सुद्धा करत होत्या आणि तसेच घडले आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी काही बालकांचा जन्म सामान्य प्रसूतीद्वारे तर काहींचा शस्त्रक्रियेद्वारे झाला. या दिवशी जन्मलेल्या अनेक मुलांची नावे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या नावावर ठेवली गेली आहेत.
प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या एका अहवालानुसार, 22 जानेवारी रोजी मध्य प्रदेशात 500 हून अधिक मुलांचा जन्म झाला. एकट्या भोपाळमध्ये सुमारे 150 प्रसूती झाल्या. याशिवाय ग्वाल्हेरमध्ये 90, इंदूरमध्ये 35 आणि शिवपुरीमध्ये 33 मुलांचा जन्म झाला आहे.
छतरपूरच्या जिल्हा रुग्णालयात 31 महिलांची प्रसूती झाली. यातील अनेक प्रसूती नॉर्मल होत्या, तर अनेक सिझेरियन होत्या. 19 मुले आणि 13 मुलींचा जन्म झाला. तर, उत्तराखंडमध्ये 250 हून अधिक मुलांचा जन्म झाला. त्यापैकी सर्वाधिक प्रसूती डेहराडूनमध्ये झाली.
डेहराडूनमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या दिनी 71 नवजात बालके या जगात आली. उधम सिंग नगरमध्ये 55 प्रसूती झाल्या. बागेश्वरमध्ये 6, चमोलीमध्ये 14, चंपावतमध्ये 4, हरिद्वारमध्ये 24, नैनितालमध्ये 24, पौडीमध्ये 17, रुद्रप्रयागमध्ये 13, टिहरीमध्ये 16, उत्तरकाशीमध्ये 9 नवजात बालकांचा जन्म झाला.