Stock Market Updates: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले. अखेर बाजार घसरणीसह बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे बाजार दिवसाच्या उच्चांकावरून 700 अंकांनी घसरला. तर निफ्टी उच्चांकावरून 200 अंकांनी घसरला.
आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 359.64 अंकांनी किंवा 0.50% घसरला आणि 70,700.67 च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 101.35 अंकांनी घसरून 21,352 अंकांवर बंद झाला.
मार्केट कॅप घसरली –
शेअर बाजार लाल रंगात बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 371.28 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 371.39 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांची संपत्ती 11,000 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
दरम्यान, आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, फार्मा, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील समभाग घसरले. तर कमोडिटी, ऊर्जा, रिअल इस्टेट, धातू आणि वाहन समभाग वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप समभागांमध्ये घसरण झाली तर स्मॉल कॅप समभागांचा निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 11 समभाग वाढीसह बंद झाले तर 19 समभाग तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 17 समभाग वाढीसह बंद झाले तर 33 समभाग घसरले.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात बजाज ऑटो 5.33 टक्के, अदानी पोर्ट्स 2.29 टक्के, एनटीपीसी 1.91 टक्के, कोल इंडिया 1.78 टक्के, रिलायन्स 0.68 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.57 टक्के वाढीसह बंद झाले. टेक महिंद्रा 6.10 टक्के, सिप्ला 3.37 टक्के, भारती एअरटेल 2.47 टक्के घसरणीसह बंद झाले.