IND vs ENG 1st Hyderabad Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कसोटीत आक्रमक क्रिकेट खेळणारा इंग्लिश संघ भारतीय फिरकीपटूंसमोर हतबल झाला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडला 246 धावांत गुंडाळले.
भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. या दोघांनी तीन इंग्लिश फलंदाजांना आपले बळी बनवले. तिसरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलही मागे राहिला नाही, त्याने 2 बळी घेतले. याशिवाय उर्वरित दोन विकेट जसप्रीत बुमराहच्या खात्यात गेल्या.
Innings Break!
A solid bowling display from #TeamIndia! 💪 💪
England all out for 246.
3⃣ wickets each for @ashwinravi99 & @imjadeja
2⃣ wickets each for @Jaspritbumrah93 & @akshar2026Scorecard ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2YnS3ZxSI2
— BCCI (@BCCI) January 25, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी संघाचा चांगला पाया रचला. दोघेही भारतीय वेगवान गोलंदाजांविरुद्ध सहज धावा काढत होते. पण फिरकी गोलंदाजी सुरू होताच बॅजबाॅलची हवा निघून गेली. इंग्लंडने 55 धावांवर पहिली विकेट गमावली आणि त्यानंतर विकेट्सची पडझड सुरू झाली.
अवघ्या 39 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 35 धावा करणाऱ्या बेन डकेटला अश्विनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ओली पोपलाही जास्त वेळ क्रीझवर थांबता आले नाही. तो भारतीय फिरकीपटूंसमोर असहाय्य दिसत होता आणि 11 चेंडूत केवळ 01 धावा काढून तो निघून गेला.
इंग्लंडला पहिला धक्का 55 धावांवर, दुसरा धक्का 58 धावांवर आणि तिसरा धक्का 60 धावांवर बसला. तिसरी विकेट जॅक क्रॉलीच्या रूपाने पडली, जो 40 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर सीनियर फलंदाज जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाची धुरा सांभाळली, पण दोघेही जास्त वेळ क्रीजवर उभे राहू शकले नाहीत. संघाची धावसंख्या 121 असताना बेअरस्टो 5 चौकारांच्या मदतीने 37 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर काही वेळात जो रूटही पॅव्हेलियनमध्ये परतला. रूटने 60 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची (105 चेंडू) भागीदारी केली.
संघाने 125 धावांवर रुटच्या रूपाने पाचवी विकेट गमावली. त्यानंतर इंग्लंडला सहावा धक्का बेन फॉक्सच्या (04) रूपाने 137 धावांवर बसला. यानंतर रेहान अहमद 13, टॉम हार्टली 23 आणि मार्क वुड 11 धावा करून बाद झाला. इथंपर्यंत इंग्लिश संघाने एकूण 9 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला 10 वा आणि शेवटचा धक्का बसला तो कर्णधार बेन स्टोक्सच्या रूपाने, जो चांगली खेळी खेळत होता. स्टोक्सने 88 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या, ही इंग्लिश डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.