Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आता जवळ आले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. अनेक वर्षांनंतर रामलल्ला आपल्या महालात बसतील. अयोध्या बाबरी मशीद प्रकरणानंतर एका व्यासपीठावर श्रीरामाच्या बालस्वरूपाची पूजा केली जात होती. आता राम मंदिरात श्री राम लल्लाची नवीन मूर्ती बसवण्यात येणार आहे. राम मंदिरात स्थापित होणारी राम लल्लाची नवीन मूर्ती ही जगातील सर्वात अनोखी मूर्ती असेल, असे सांगण्यात येत आहे.
पण रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा आधी श्रीराम मंदिराच्या गर्भगृहातील एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आले आहे. या नव्या फोटोत रामलल्ला यांच्या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांचा श्रृंगार परिधान करण्यात आलेला दिसतोय. या फोटोत रामलल्लांच्या डोळ्यावर पट्टी दिसत आहे. पण त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने परिधान करण्यात आलेलं बघायला मिळत आहे. या फोटोच्या निमित्ताने रामभक्तांना रामलल्ला यांच्या अतिशय सुंदर मूर्तीचं दर्शन झालं आहे.
मैसूरचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी रामलल्लांची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती 51 इंचाची आहे. या मूर्तीला18 जानेवारी सकाळी मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आलं होतं. कमळच्या फुलात विराजमान झाल्यानंतर या मूर्तीची उंची ही 8 फूट इतकी होते. या मूर्तीचं वजन 150 ते 200 किलोग्रामच्या आसपास आहे. रामलल्लांच्या या मूर्तीला काळ्या पाषाणातून साकारण्यात आलं आहे.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात येणार आहे. या दिवशी अयोध्येत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राणप्रतिष्ठा दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान असतील. तसेच, RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश असेल.