जळोची – जिद्द आणि चिकाटी असेल तर सर्व काही शक्य होते. मी ते करू शकतो हा आत्मविशवास जर मनामध्ये असला तरी अशक्य गोष्ट शक्य होते. आणि तीच अशक्य गोष्ट आता बारामतीतील 65 वर्षाच्या ललित पटेल आणि त्यांच्या पत्नी गीता पटेल यांनी शक्य करून दाखवली आहे. बारामती- महाबळेश्वरची 250 किलोमीटरची रॅली पूर्ण करून तरूणांना संदेश दिला आहे.
सळसळता उत्साह, काहीतरी नवीन करून दाखविण्याची जिद्द, आम्हीही हे करू शकतो, या प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर दहा महिलांसह 65 हौशी सायकलपटूंनी बारामती ते महाबळेश्वर आणि महाबळेश्वर ते बारामती अशी 250 किलोमीटरची सायकल रॅली पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे 65 आणि 58 वर्ष वय असताना देखील या दोघांनी बारामती ते महाबळेश्वर अशी स्पर्धा अवघ्या काही तासांमध्ये पार
पडली आहे.
बारामतीत सायकल चळवळीला प्रोत्साहन मिळावे, व्यायामाची आवड समाजात वाढीस लागावी, युवक व महिलांमध्ये सायकल चालविण्याची सवय लागावी, या उद्देशाने बारामती स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती, फलटण आदर्की, वाई, पाचगणीमार्गे महाबळेश्वरचे 250 किलोमीटर अंतर पार करत ही मोहीम फते केली. सर्वांचा सळसळता उत्साह दांडगा होता.
रॅलीमध्ये सोळा वर्षांच्या युवकांपासून ते ललित पटेल व गीता पटेल या ज्येष्ठांनी ही रॅली पार पाडली. तरुण मुलींनी तसेच महिलांनी वेळ काढून दररोज व्यायाम करणे गरजेचे असल्याचे गीता पटेल यांनी सांगितले. काही महिन्यात गीता पटेल यांनी सायकलिंगद्वारे 109 किलो वजन हे थेट 51 किलोपर्यंत घटविले होते. अनेक सायकल रॅलीमध्ये सहभाग देखील घेतला होता. करोनावर मात करायची असेल तर व्यायामाची गरज आहे.
राज्यभरातील विविध स्पर्धांमध्ये यश
पटेल यांनी यापूर्वी देखील अनेक सायकल स्पर्धेमध्ये, मॅरेथॉनमध्ये सायकल रॅलीमध्ये दोघांनी सहभाग घेत अनेक मेडल, ट्रॉफी मिळवली आहेत. यामध्ये कोल्हापूर स्पोर्ट क्लब ड्युट लॉन स्पर्धा, सातारा हिल मॅरेथॉन, कासपठार स्पर्धा, महा मॅरेथॉन स्पर्धा, बजाज लाइफ मॅरेथॉन, शरद मॅरेथॉन, आदी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.
कॉलेजमध्ये असताना तर तरुणपणी ललित पटेल यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धा गाजवल्या आहेत. अनेक सायकल रॅलीमध्ये सहभाग देखील घेतला होता. करोनावर मात करायचा असेल आणि प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दररोज निती नियमाने व्यायाम, सायकलिंग, रनिंग केली पाहिजेत, असे ललित पटेल यांनी सांगितले.