पुणे – मार्केट यार्डात अफगाणिस्तानच्या कांद्याची आवक झाली. तिखटपणा कमी असणे, तसेच चवदार ग्रेव्ही बनत नसल्याने या कांद्याच्या खरेदीकडे हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींने पाठ फिरविली आहे. हैद्राबाद येथील व्यापाऱ्यांनी या कांद्याची खरेदी केली असून, आणखी माल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती व्यापारी राजशेखर पाटील यांनी दिली.
येथील बाजारात गुरुवारी (दि.5) पाटील यांच्या गाळ्यावर 50 टन कांद्याची आवक झाली. त्यापैकी 25 टन मालाची विक्री झाली. 25 टन माल अद्याप विक्रीसाठी उपलब्ध आहे. केंद्र सरकारने कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी परदेशातील कांदा आयातीचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार मार्केट यार्डात अफगाणिस्तानच्या कांद्याची आवक झाली. दरम्यान, नाशिक येथील बाजारात घडलेल्या घडामोडीनंतर कांद्याचे भाव घसरले आहेत. त्याचा फटका अफगाणिस्तानच्या कांदा विक्रीला बसला आहे.
अफगाणिस्तानच्या भावातच भारतीय कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफगाणिस्तानचा कांदा खरेदीचे टाळले आहे. दरम्यान, रविवारी 100 ते 125 गोणी नवीन कांद्याची आवक झाली. त्यास किलोस घाऊक बाजारात 10 ते 40 रुपये भाव मिळत आहे. जुन्या कांद्याला किलोसाठी 20 ते 55 रुपये मोजावे लागत आहे. रविवारी येथील बाजारात सुमारे 30 ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली.
अफगाणिस्तानचा कांदा आकाराने मोठा आहे. 200 ते 300 ग्रॅम एका कांद्याचे वजन आहे. घाऊक बाजारात किलोस 35 रुपये भाव मिळत आहे. 16 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत परदेशातून आणखी 1500 कंटेनर कांद्याची आवक भारतात होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीवरून पुढील दोन महिने कांद्याचे भाव तेजीत राहणार असल्याचे दिसून येत आहे.
– राजशेखर पाटील, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड