मुंबई- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा करोना अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. यामुळे आता ते बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार आहेत. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्कही बजाविणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाल्याने राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ते उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु मतदानाच्या एक दिवसापूर्वीच ते करोनामुक्त झाले आहेत. यामुळे ते पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहणार आहेत.
लातूर-सोलापूर दौऱ्यावर असताना फडणवीसांची प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांनी दौरा अर्धवट सोडला होता. मुंबईत आल्यावर करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज पाचव्या दिवशी फडणवीसांचा अहवाल करोना निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, फडणवीस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तर राज्यसभेसाठी भाजपकडून तीन उमेदवार देण्यात आले आहेत. या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी केंद्राने फडणवीसांना दिली आहे. यामुळे फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.