कराची – पाकिस्तानात अल्पसंख्यांक हिंदूंच्या मंदिरावर पुन्हा एकदा कट्टरवाद्यांनी हल्ला केला आहे. सिंध प्रांतात कराचीमधील एका मंदिरावर केलेल्या हल्ल्यामध्ये मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि मंदिरातील मूर्तीची विटंबनाही करण्यात आली. कराचीतील कोरंगी नंबर 5 भागामध्ये ही घटना घडली आहे.
श्री मरी माता मंदिरावर काल संध्याकाळच्या सुमारास कट्टरवाद्यांनी हल्ला केला. या मंदिराच्या आवारातच राहणाऱ्या पुजाऱ्याच्या घरावर हा हल्ला करण्यात आला आणि मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्यामुळे स्थानिक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आतापर्यंत या प्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांकडून कोणालाही अटक करण्यात आली नाही. बांधकाम सुरू असलेल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी पुजारयांनी काही दिवसांपूर्वीच नवीन मूर्ती आणली होती.
हा हल्ला कोणी केला आणि का केला, हे माहिती नाही, असे पुजाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. मोटर सायकलवरून आलेल्या एकूण 6 ते 8 जणांनी हा हल्ला केला असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले.
या तोडफोडीच्या संदर्भातील पुरावे गोळा केले जात असून या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच मंदिराशी संबंधितांना संरक्षण देण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानातील मंदिरांवर कट्टरवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जात असतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सिंध प्रांतातील कोटरी येथील मंदिरावरही अशाच प्रकारे हल्ला झाला होता. सिंध प्रांतात मंदिरांवरील हल्ल्यांबरोबर अल्पसंख्यांक हिंदू महिलांचे अपहरण आणि धर्मातराचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे मानवी हक्क विषयक मंचाने म्हटले आहे. हिंदू, शीख आणि ख्रिस्चन समाजावरील असे हल्ले ही अतिशय चिंतेची बाब बनली आहे.