गंगटोक – सिक्कीममधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या एकमेव जागेवर भाजपचे उमेदवार दोर्जी शेरिंग लेप्चा यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात इतर कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता.
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एसडीएफ) नेते हिशे लाचुंग्पा सध्या सिक्कीममधून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला समाप्त होत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी राज्यसभा निवडणूक जाहीर करण्यात आली.
त्या जागेसाठी भाजपने लेप्चा यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला त्या राज्यातील सत्तारूढ सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) पाठिंबा जाहीर केला. तो पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक आहे. एनडीएचे अधिकृत उमेदवार बनल्याने लेप्चा यांचा विजय निश्चित झाला.
सिक्कीममध्ये विधानसभेच्या एकूण ३२ जागा आहेत. एसकेएमचे १९, तर भाजपचे १२ आमदार आहेत. उर्वरित एकमेव आमदार एसडीएफचा आहे. राष्ट्रीय पातळीवर एनडीएचे घटक असले तरी एसकेएम आणि भाजपची सिक्कीममध्ये हातमिळवणी नाही. त्या राज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपला एकही जागा मिळाली नाही.
मात्र, नंतर लेप्चा यांच्यासह १० आमदारांनी एसडीएफला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजप सिक्कीममधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला. नंतर विधानसभेच्या २ जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला. त्यामुळे त्या पक्षाच्या आमदारांची संख्या १२ इतकी झाली.