दिलीपराज चव्हाण
-प्रा. आरोग्य केंद्राची यशस्वी कामगिरी
-पोलीस प्रशासनाचे योग्य निर्णय
-ग्रामपंचायतीची सजगता
-करोना साखळी खंडित करण्यात यश
कराड -गेल्या दोन महिन्यांपासून उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, तलाठी, पोलीस पाटील, आपत्ती व्यवस्थापन समिती यांना जिल्हा व तालुका प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज विभागातून करोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे. गुरुवारी महिला पोलीस अधिकाऱ्यांसह सात जणांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. तर निकट सहवासीत लोकांचे रिपोर्ट यापूर्वी निगेटिव्ह आल्याने उंब्रज पूर्णतः करोनामुक्त झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
करोनामुक्त रूग्णांचे उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, डॉ. स्नेहा निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, संग्रामसिंह पलंगे, उपसरपंच अजित जाधव, डॉ. दीपक माने, डॉ. कुलकर्णी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वागत करुन उंब्रज करोनामुक्त झाल्याचा संदेश दिला.
मे महिन्यात उंब्रज येथील चोरे रोडलगत एका कॉलनीत वास्तवास असणाऱ्या युवतीचे रिपोर्ट करोनाबाधित आले होते. त्यानंतर उंब्रजमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
त्यानंतर आठवड्याभरात उंब्रज येथील एक बालरोगतज्ज्ञ बाधित झाले. भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु, पहिल्या टप्प्यात हे दोघेही करोनामुक्त झाले. त्यामुळे उंब्रजचा करोनामुक्तीकडे प्रवास सुरू झाला. परंतु, हा आनंद फार काळ टिकला नाही. संबंधित चोरे येथील युवतीच्या निकटवर्तीयांपैकी तिचे वडील व अन्य एक असे दोघांचे रिपोर्ट करोना पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा धास्ती वाढली. पंधरा दिवसात हे दोघेही करोनामुक्त झाले. त्यामुळे दिलासा मिळत होता. तोच परजिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या तिघांची नव्याने भर पडली. तसेच मागील आठवड्यात मुंबई येथून आलेल्या महिला पोलीस अधिकारी यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चितेंचे वातावरण होते. गुरुवारी या महिला अधिकारी करोनामुक्त झाल्या.
दरम्यान, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 24 गावे आहेत. त्यापैकी पाच गावांमध्ये करोनाचे रुग्ण सापडले. याची सुरुवात चरेगावपासून झाली. वनवासमाचीने तर रेकॉर्डब्रेक केले. खोडशी, उंब्रज, खालकरवाडी येथे रुग्ण सापडले. त्यांच्या निकट सहवासीत लोकांना संस्थात्मक व होम क्वारंटाइन केले. बाधितांसह क्वारंटाइन रूग्णांवर योग्य उपचार तसेच प्रार्दुभाव रोखण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी योग्य नियोजन केले. तर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या प्रयत्नाला यश आले.
उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 24 गावे असून त्यापैकी पाच गावांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले. यात चरेगाव, वनवासमाची, खोडशी, उंब्रज, खालकरवाडी गावांचा समावेश होता. ही सर्व गावे करोनामुक्त झाली आहेत. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
डॉ. संजय कुंभार, वैद्यकीय अधिकारी उंब्रज
उंब्रज विभागात करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांचे मार्गदर्शन व पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासूचनेनुसार चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. संचारबंदी व लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी उंब्रज विभागातील लोकप्रतिनिधी व नागरिकांसह उंब्रज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे उंब्रज करोनामुक्त झाले.
अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक उंब्रज