विधानसभेच्या 49 जागांवर लढण्याची तयारी – राजू शेट्टी

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 49 जागांवर लढण्याची तयारी केली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. असे असले तरी महाआघाडीतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनासोडून कोणत्याही पक्षाबरोबर जाण्याची तयारी आहे. उलट सर्व पक्षीयांनी मतभेद विसरून एकत्र निवडणूक लढविण्यात यावी अशीच आमची भूमिका आहे. कोणत्याही कारणाने आघाडी न झाल्यास आमची स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पुण्यात झाली. या बैठकीच्या समारोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे, पूजा झोळ, दशरथ सावंत, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले या वेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीर केल्या प्रमाणे कृषी मालाला खर्चाच्या दीडपट भाव जाहीर करावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि वीज बिलांतून सूट द्यावी, शेतमालाला हमी भाव जाहीर करावा, दुष्काळ जाहीर झालेल्या ठिकाणी पीक विमा जोखीम रक्‍कम देण्यात यावी, दूध पिशव्यांवरील निर्बंधाचा फेर विचार करावा, अशा मागण्यांचा ठराव या वेळी करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतांपैकी अधिक मते मोजण्यात आली. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविला आहे. मात्र, महिना उलटूनही त्यावर आयोगाने उत्तर दिलेले नाही. मतदारांचा ईव्हीएमवर विश्‍वास राहीला नाही. या मतदान व्यवस्थेवर विश्‍वास नसेल तर पुन्हा पूर्वी प्रमाणेच मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याबाबत आयोगाने विचार करायला हवा, असे शेट्टी म्हणाले. आपण पुन्हा आमदारकीची निवडणूक लढविणार का ? असे विचारले असता मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही, असे शेट्टी म्हणाले.

राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपद सोडू नये
कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये. लोकसभा निवडणुकीत त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. गांधी यांनी पुन्हा ताकदीने उभे राहून कामाला लागले पाहिजे. त्यांना पदत्याग करायचा असेल तर विजयी होऊन करावा, असे राजू शेट्टी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.