‘त्या’ मृत कामगारांच्या नातेवाईकांना निर्वाह भत्ता द्यावा – बापट

पुणे – पुण्यातील कोंढवा, आंबेगाव येथील अपघातांत बांधकाम मजूर मृत झाले. असे प्रकार बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे होत असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. अशा अपघातांत मृत असंघटित कामगारांच्या नातेवाईकांना निर्वाह भत्ता मिळावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी संसदेत केली.

खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर आज पहिल्यांदा बापट यांनी संसदेत निवेदन केले. ते म्हणाले, “पुण्यात घडलेल्या या घटना या पुणे महापालिका तसेच महाराष्ट्र राज्याचा विषय असला, तरीही देशभरात अशा घटना घडत आहेत. त्या टाळण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांवर काही निर्बंध लावणे आवश्‍यक आहे. बांधकाम व्यावसायिक सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. बांधकाम नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे आवश्‍यक आहे. बांधकाम ठिकाणावरून योग्य अंतरावर कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची परवानगी द्यावी.

या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा किंवा दंड आकारण्याचे प्रावधान करावे. प्रत्येक नगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात यावा. या माध्यमातून अशा आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहोचवता येईल. असे कक्ष नगरपालिकेत कार्यरत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला कोणते निर्देश दिले आहेत का? किंवा तसे निर्देश देण्याचा विचार आहे का? याबाबत माहिती देण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली.

Leave A Reply

Your email address will not be published.