वरवरा राव यांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे – माओवादी संघटनांशी संबंधांच्या संशयावरून अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना बुधवारी कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटकमधील तुंकुर जिल्ह्यात 2005मध्ये माओवाद्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना राव यांचा ताबा घेतला आहे.

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात राव यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. नजरकैदेची मुदत संपताच त्यांना 17 नोव्हेंबर 2018 रोजी पुन्हा अटक करून येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी ऍड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन, व्हर्णन गोन्साल्वीस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली असून ते सर्व येरवडा कारागृहात आहेत.

“राव यांना बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा (यूएपीए) लागू होत नाही. त्यामुळे त्यांना जामीन द्यावा,’ अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली आहे. त्यावर युक्तिवाद सुरू असतानाच ही कार्यवाही झाली. या प्रकरणात पोलिसांनी दहा आरोपींच्या विरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. “बंदी असलेल्या सीबीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरो (ईआरबी) समितीचा सचिव व केंद्रीय समिती सदस्य किशन दा ऊर्फ प्रशांत बोस आणि रोना विल्सन यांच्यासह संघटनेच्या इतर भूमिगत सदस्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट केला. एल्गारमुळेच कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती,’ असे त्यात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.