मोरगाव (प्रतिनिधी) – मानाच्या पाच तोफांची गगनभेदी सलामी, शोभेचा दारुगोळा व फटाक्यांची अतिषबाजी आणि मुखी मोरया मोरया च्या जय घोषात अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथील मयुरेश्वरा चा राजेशाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात व अभूतपूर्व वातावरणात संपन्न झाला. तब्बल चौदा तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या सिमोउल्लंघन सोहळ्यात राज्यासह परराज्यातील भाविकांनी हजेरी लावून या नेत्रदीपक सोहळ्याचा आनंद लुटला.
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे वर्षभर साजऱ्या होणाऱ्या आनंदोत्सवांपैकी दसरा हा सण मोठ्या उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बुधवारी विजयादशमीनिमित्त मयुरेश्वरा चा पालखी सोहळा व नियोजनाबाबत मंदिराच्या दगडी फरसावर सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांची बैठक पार पडली.
या बैठकीत रात्रीच्या कार्यक्रमाचे नियोजन व मानकऱ्यांना शिधा वाटप करण्यात आला. दुपारी चार वाजता मयूरेश्वरला हिरे माणिक मोती जडित अलंकार व भरजरी पोषाख चढवण्यात आला.
पूजन व गुरव मंडळींची पूजा झाल्यानंतर मुख्य घाबरा सोन्या वाहण्यासाठी खुला करण्यात आला. विजयादशमी दिवशी रात्री हजारो गणेश भक्त व भाविकांच्या उपस्थितीत या दसरा सोहळ्यास सुरवात झाली. हा सोहळा छत्री, अबदागिरी, निशाने, चौर्या, झेंडे , हिलाळ व बैलगाड्या तील नगारखान्याच्या ग्राम दैवतांच्या भेटीस मार्गस्थ झाला.
मयुरेश्वर मंदिरासमोरील मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत तोफांच्या सलामी नगरात चौघड्यांच्या मंगलमय सुरत पालखी सोहळा बाजार तळावर पोहोचला. या ठिकाणी हजारो भाविक व गणेश भक्तांच्या उपस्थितीत रावणाचे दहन करण्यात आले यावेळी मोठी अतिषबाजी देखील करण्यात आली होती.
पुढे हा पालखी सोहळा कर्हा नदीच्या उत्तर तीरावर पोहोचल्यानंतर महान साधू मोरया गोसावी यांची आरती होऊन या ठिकाणी मानाची हरमल खेळण्यात आली. ग्रामदैवत फिरंगाई देवी चा गोंधळ व त्यानंतर बुद्धी देवी दर्शन भैरवनाथ मंदिर खंडोबा मंदिर भेटीनंतर हा पालखी सोहळा मुख्य चौकातून सोनबा मंदिर परिसरात दाखल झाला. या ठिकाणी पूर्व परंपरे नुसार मानकऱ्यांच्या पूर्वज वंशावळीचे वाचन करण्यात आले.
या शाही दसरा उत्सव निमित्त गावात सर्वत्र विद्युत रोशनाई घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा नंतर मोरेश्वरा चा राजेशाही थाटातील पालखी सोहळा मोरया मोरया नामाचा जयघोष करीत रंगीत फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मयुरेश्वर मंदिरात दाखल झाला. महान साधू मोरया गोसावी यांच्या आरतीने या महाकाय सोहळ्याची हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली.