नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती असून गेल्या पाच महिन्यांपासून चीन सीमेवरील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे विजयादशमीला (दसरा) सिक्कीमला भेट देण्याची शक्यता आहे. चीन सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ही भेट असेल.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे 23 आणि 24 ऑक्टोबरला दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सामरिक दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या विविध रस्ते बांधणीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. सीमा भागात बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यांमुळे भारतीय सैन्याला जलद गतीने वाहतूक करता येईल. यासोबतच सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांनाही या रस्त्यांचा उपयोग होईल, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले आहे.
राजनाथ सिंह हे आपल्या सिक्कीम दौऱ्यात पारंपरिक पद्धतीने ज्शस्त्रपूजन करतील, असे सांगण्यात येते. विजयादशमी निमित्त दसऱ्याच्या मुहूर्तावर चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत ते पारंपरिक पद्धतीने शस्त्रांचे पूजन करतील आणि विजयादशमी म्हणजे दसरा साजरा करतील. गेल्या वर्षी राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये भारताला देण्यात आलेल्या अत्याधुनिक राफेल विमानाची दसऱ्याच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने पूजा केली होती. त्यानंतर वर्ष 2020 मध्ये तीन राफेल विमाने भारतीय वायुदलात दाखल झाली आहेत.
विजयादशमिनित्त दसऱ्याच्या मुहूर्तावर चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांसमवेत राजनाथ सिंह वार्तालाप करतील आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील. भारताचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रतीवर्षी आपली दिवाळी भारतीय जवानांसमवेत साजरी करत असतात. यावर्षी ते लष्कराच्या कोणत्या ठाण्यावर दिवाळीसाठी जाणार, याबाबतही नागरिक आणि जवानांमध्ये उत्सुकता आहे.