पाटणा – बिहार आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात जात आणि धर्म यांना अनन्यसाधारण महत्व असते. ज्या पक्षाची अथवा आघाडीची जातींची समीकरणे घट्ट बसतात त्याच पक्षाला अथवा आघाडीला सत्ता मिळते. जाहीर व्यासपीठावरही जात आणि त्या जातीचे मतदारसंघातील प्राबल्य डोळ्यासमोर ठेवतच घोषणाबाजी केली जाते, गाजर दाखवले जाते. कोणताच पक्ष याला अपवाद नाही.
मात्र याच पक्षांचे नेते खासगी आयुष्यात मात्र या जात आणि धर्मवादाच्या वर जात वेगळी कृती करताना दिसतात. बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे रण तापले असताना आणि जातींची गणिते मांडली जात असताना काही नेत्यांच्या विवाहाच्या विशेषत: प्रेमविवाहाच्याही चर्चा रंगताना दिसत आहेत. त्याला कारण या नेत्यांनी जातीच्या पलिकडे व काही नेत्यांनी तर धर्माच्या पलिकडे जाउन आपला जीवनसाथी निवडला आहे.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनी हिंदू महिलेशी लग्न केले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रेणू आहे. त्यांचे बंधूही भाजपमध्ये मोठे नेते आहेत व त्यांनीही केंद्रात मंत्रिपद भूषविले आहे. 1992 चे बाबरी प्रकरण आणि त्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली यामुळे संपूर्ण देशात हिंदू- मुस्लिम विद्वेषाचे वातावरण होते. मात्र त्याचवेळी शाहनवाज आणि रेणू यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. 1994 मध्ये हे दोघे विवाहबध्द झाले.
श्याम रजक:
लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाचे बडे नेते श्याम रजक यांनीही जातीची सीमारेषा ओलांडून प्रेमविवाह केला. त्यांच्या पत्ती अल्का या पत्रकार आहेत. रजक हे दलित समाजातील आहेत. तर अल्का मात्र सवर्ण. समाजाच्या भीतीने दोघांच्या कुटुबीयांचा या विवाहाला विरोध होता. मात्र तरीही त्यांनी घरच्यांची तब्बल सात वर्षे समजूत काढली व अखेर विवाह झाला. या विवाहाला बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान यानेही हजेरी लावली होती. त्यामुळे विवाह चर्चेचा विषय ठरला होता.
सुशील मोदी:
भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही प्रेमविवाह केला आहे. त्यांच्या पत्नी ख्रिश्चन आहेत. या दोघांची रेल्वे प्रवासात भेट झाली होती. त्यानंतर सुशील मोदी आणि जेसिस जॉर्ज विवाहाच्या बंधनात अडकले.
पप्पू यादव:
माजी खासदार पप्पू यादव यांनी शीख धर्मीय रणजिता रंजन यांच्याशी विवाह केला आहे. पप्पू यादव हिंदू आहेत. त्यांचा बिहारच्या राजकारणात एक वेगळात दबदबा आहे. मात्र या दोघांची लव्ह स्टोरी हिंदी चित्रपटातील लव्ह स्टोरीपेक्षा कमी रंजक नाही असे सांगितले जाते.
रामविलास पासवान:
आता हयात नसलेले मात्र केंद्रीय पातळीवर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवणारे रामविलास पासवान यांनीही जातीबाहेरच्या मुलीशी प्रेमविवाह केला. रिना शर्मा या त्यांच्या द्वितीय पत्नी. सवर्ण असलेल्या रिना शर्मा एअर होस्टेस होत्या. त्यांच्या प्रेमात रामविलास पासवान पडले. लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे यांचे सुपुत्र.
राजीव प्रताप रूडी:
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांच्या पत्नी निलमही एअरहोस्टेस होत्या. विशेष म्हणजे रूडी जेव्हा नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री झाले तेव्हा त्यांनी नौकरीचा राजीनामा दिला.