‘राम मंदिरासाठी मोदींचे नाही तर राजीव गांधींचे योगदान’

मुंबई – येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा होणार असून मोठ्या प्रमाणावर तयारीही सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानेच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरासाठी कोणतेही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचे झाले तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव घ्यावे लागेल, अशा शब्दांत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले आहे. 

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या चर्चेत बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे. यासंबंधीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणखी कोणाकोणाला निमंत्रण द्यायला हवे होते, असे विचारल्यावर स्वामी म्हणाले, राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचे कोणतेही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सरकारच्यावतीने त्यांनी असे कोणतेही काम केलेले नाही, ज्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर उभारले जात आहे.

राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केले. त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती, असेदेखील सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले आहे.

तसेच, राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या ५ वर्षांपासून पडून आहे. मात्र, त्यांनी आजवर यावर स्वाक्षरी केलेली नाही. मी कोर्टात जाऊन यावर आदेश मिळवू शकतो. मात्र, मला वाईट वाटतंय की आमचा पक्ष असतानाही आम्हाला कोर्टात जावं लागत आहे, अशी खंतही त्यांनी बलून दाखवली.

दरम्यान, प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी त्यांचे मंदिर उभारले जावे ही राजीव गांधी यांचीच इच्छा होती, असे ज्येष्ठ कॉंग्रस नेते दिग्विजयसिंह यांनी शनिवारी म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.