रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती वेगळी- जितेंद्र आव्हाड

मुंबई : नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती वेगळी असेही ते म्हणाले आहेत.

“प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम असे आपण म्हणतो, त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचे एवढं काही नाही, त्यांना वाटतंय ते करत आहेत,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. भूमिपूजनासाठी जोरदार तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा नेत्या उमा भारती, अवधेशानंद सरस्वती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, कल्याण सिंह, विनय कटियार उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्य पुजाऱ्याबरोबच १६ सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी समोर आली. रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले. आचार्य सत्यंद्र दास यांचे शिष्य असणारे प्रदीप हे रामजन्मभूमीच्या प्रमुख चार पुजाऱ्यांपैकी एक आहेत. दास यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.