Rajinikanth – थलायवा उर्फ रजनीकांत (Rajinikanth) यांचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत तब्बल 33 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. ‘थलाइवर 170’ असे या सिनेमाचे नाव आहे. तब्बल 33 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहते देखील आनंदी आहेत.
रजनीकांत यांची तुफान फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात. एवढंच नाही तर त्यांना चाहते आदर्श देखील मानतात. आता रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याविषयी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्यानं त्यांच्या आयुष्यातील दारूच्या व्यसनाबद्दल खुलासा केला.
याविषयी बोलताना ‘दारू नसती तर समाजाची सेवा केली असती’ असं ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, ‘दारूचे व्यसन ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मी असे म्हणत नाही की ते पूर्णपणे टाळा.
मजा आली की दारू प्या. नियमित मद्यपान करू नका. हे आरोग्य आणि आनंद खराब करेल.’ असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील रजनीकांत यांनी आपल्या व्यसनाबद्दल मनमोकळे पणे बोलून दाखवलं आहे.