राजगुरूनगर (पुणे ) – पुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या राजगुरूनगर सहकारी बॅंकेने 2021-2022 या आर्थिक वर्षाअखेरील निव्वळ एनपीए (Net NPचे प्रमाण 3 टक्क्यांपेक्षा कमी राखल्याबद्दल पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स् असोशिएशनचा उत्कृष्ट नागरी बॅंक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांनी दिली.
बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांनी मंगळवारी (दि.26) पत्रकार परिषद घेत वरील माहिती दिली. याप्रसंगी किरण मांजरे, विजया शिंदे, दिनेश ओसवाल, हेमलता टाकळकर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, संजय ससाणे, अमृत टाकळकर, मनजीत महिंदर, अंकुश कोहिनकर, सम्राट सुपेकर, गायत्री बेरी हे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते व संचालक मंडळ यांच्या हस्ते हा पुरस्कार अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, संचालक ऍड. मुकुंद आवटे, किरण मांजरे, सतीश नाईकरे, विजया शिंदे, तज्ज्ञ संचालक किसन गारगोटे व बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी तो स्वीकारला.
राजेंद्र वाळुंज म्हणाले की, कर्जदारांनी सहकार्य केल्याने बॅंकेचा निव्वळ एनपीए (Net NP चे प्रमाण 3 टक्क्यांपेक्षा कमी झाला यात वसुली अधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. मागील आर्थिक वर्षात बॅंकेला 33 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बॅंक सतत नवनवीन आव्हाने पेलत रिझर्व बॅंकेच्या नियमावलीचे पालन करीत आली आहे. येणाऱ्या आव्हानाला बॅंक सक्षम आहे त्या अनुषंगाने चांगले काम करण्याचा सर्वाचा प्रयत्न आहे. विविध पुरस्कार मिळाल्याने राजगुरूनगर सहकारी बॅंकेने उत्तुंग भरारी घेतली आहे.
“राजगुरूनगर सहकारी बॅंकेचा व्यवसाय 2 हजार कोटी रुपयांच्या वर गेला आहे. बॅंकेच्या 17 शाखा झाल्या आहेत. 34 हजार 521 सभासद संख्या आहे.42 कोटी 57 लाख भागभांडवल, 191 कोटी 27 लाख रिझर्व निधी, 1258 कोटी 59 लाख रुपयांच्या ठेवी तर 755 कोटी 93 लाख रुपयांचे आतापर्यंत बॅंकेने कर्जवाटप केले आहे.”
– शांताराम वाकचौरे(मुख्य कार्यकारी अधिकारी, राजगुरूनगर बॅंक)
आतापर्यंत 25 पुरस्कार प्राप्त
सर्व सभासद ग्राहक, संचालक, अधिकारी, कर्मचारीवर्ग यांच्या कामगिरीमुळे बॅंकेला आतापर्यंत 25 पुरस्कार मिळाले आहेत तर पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स् असोशिएशचा हा चौथा पुरस्कार आहे.