राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) – राजगुरूनगर येथे आज विविध मागण्यांसाठी खेड पंचायत समितीच्या समोर दिव्यांगांनी वाडा रस्त्यावर सभापती, गटविकास अधिकारी, कक्ष अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रस्त्यावर नेऊन त्यांना हार घालून आंदोलन करण्यात आले.
तब्बल तीन तास दिव्यांगांनी केलेल्या रस्ता रोकोमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली.
दिव्यांगाच्या प्रहार संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे कणखर आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय पगडे, अर्चना घुंडरे, शिवशंकर मुंढे, राजेश टोपे यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींना विविध सुविधा मिळाव्यात, दिव्यांग निधी सह घरकुले व शासनाच्या योजना मिळाव्यात ग्रामसेवकांची अरेरावी थांबवावी. पंचायत समितीमध्ये अपंग व्यक्तींना बसण्यासाठी अपंग भवन उपलब्ध करावे, दिव्यांग निधीत वाढ करावी. आदी मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान, दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष न देणाऱ्या खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, गटविकास अधिकारी अजय जोशी व पंस कक्ष अधिकारी रमेश इष्टे यांच्या खुर्च्या बाहेर काढून त्या वाडा रस्त्यावर पंचायत समितीच्या पुढे रस्त्यावर उलट्या टाकून त्यांना फुलांचे हार घालून जोरदार निषेधाच्या घोषणा देत तीन तास रस्ता रोको करण्यात आला.