नवी दिल्ली – भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातातील निधनाबद्दल चीनने गरळ ओकली आहे. चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्समध्ये या संबंधात जो लेख प्रकाशित झाला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, संरक्षण दलप्रमुखांच्या हेलिकॉप्टर अपघातातील मृत्यूने भारताची लष्करी सिद्धता आणि लष्करी आधुनिकीकरणाचीच पोलखोल झाली आहे. भारतीय लष्कराची अनुशासनहिनताही यातून दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे.
एवढे बोलूनच चीन थांबलेला नाही तर त्यांनी असेही म्हटले आहे की, ज्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत यांचा मृत्यू झाला आहे ते एमआय – 17 हेलिकॉप्टर जगात सर्वत्र वापरलं जातं. या अपघातासाठी खराब हवामान, चुकीची उंची, आणि तांत्रिक बिघाड अशी कारणे भारताकडून दिली जात असली तरी आणि ती गृहीत धरली तरी ही गडबड मानवी चुकांमुळे झाली असावी असेही यात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण सध्या थांबले असून ते पुन्हा सुरू करण्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागेल असे दिसते आहे, अशी टिप्पणीही चीनने यात केली आहे. ग्लोबल टाइम्स हे सरकारी वृत्तपत्र असून त्यातून चीन सरकारच्या भूमिकेचेच प्रत्यक्ष दर्शन घडत असते असे मानले जाते. त्यामुळे यात व्यक्त करण्यात आलेली ही टीका ही थेट चीन सरकारनेच ओकलेली गरळ मानली जात आहे.