राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या बलिदान दिनी मेरा रंग दे बसंती चोला या जिवंत देखाव्याने हुतात्म्यांना बजरंग दलाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
शहीद दिनाच्या पूर्व संध्येला राजगुरुनगर शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. क्रांतीजागर नावाने काढण्यात आलेल्या या पदयात्रेत महिलांनी तसेच तरुणांनी विशेष सहभाग घेतला. हुतात्मा राजगुरू स्मृतीस्थळ राजगुरुनगर एसटी बसस्थानक येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत क्रांतीची पेटती मशाल हातात घेऊन तालुक्यातून आलेल्या गावोगावच्या तरुणांनी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांना अभिवादन केले.
यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे मेरा रंग दे बसंती चोला या देखाव्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या प्रात्यक्षिकातून क्रांतिकारकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
ही पदयात्रा सायंकाळी 7.33 वाजता हुतात्मा राजगुरू जन्मस्थळावर पोहोचली. यानंतर तीनही हुतात्म्यांना श्रद्धांजली चा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात अॅड. मृणालिनी पडवळ, रमेश कोबल यांना हुतात्मा राजगुरू यांच्या नावाने दिल्या जाणार्या पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे देवजी रावत (गुजरात), नरेश पाटील हे उपस्थित होते.