मुंबई : राज्यातील करोना नियंत्रणासाठी कोविड प्रतिबंधात्मक लस अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. त्यामुळे कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे.
राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची काल निर्माण भवन येथे भेट घेतली. याभेटीदरम्यान राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती मनसुख मांडविया यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली.
राजेश टोपे यांनी मांडविया यांना राज्यातील करोना परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्याशिवाय करोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना, लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने केलेले उल्लेखनीय काम यासारख्या विविध मुद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
करोना लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी विनंती केली. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांवरुन 28 दिवस करता येईल का? याबाबत फेरविचार करवा, जेणेकरुन लसीकरणाला वेग येईल, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
काही देशांमध्ये लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात आलेय. त्याप्रमाणे आपल्या देशातही विचार व्हावा. परदेशी नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणारे नागरिकांसाठी दोन मात्रांमधील अंतर कमी करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे याचाही विचार व्हावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी मांडविया यांना केली.