सातारा – सातारा नगरपालिकेकडे अनामत ठेवलेले पंधरा लाख परत देण्यासाठी ठेकेदाराकडून दोन लाख 30 हजारांची लाच स्वीकारताना पालिकेचे उपमुख्याधिकाऱ्यांसह तिघांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात फरारी असलेले आरोग्य निरीक्षक राजेंद्र विनायक कायगुडे (रा. एसटी कॉलनी, गोडोली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
पालिकेतील स्वच्छता ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक गणेश दत्तात्रय टोपे (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), प्रवीण एकनाथ यादव (करंजे पेठ, सातारा) यांना अटक करण्यात आली होती. आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे फरारी होता. आठ दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक कायगुडेचा शोध घेत होते. मंगळवारी कायगुडे एसीबीच्या हाती आला. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के तपास करत आहेत.