मुंबई – सलामीवीर जोस बटलरचे वादळी शतक व त्याला साथ देताना देवदत्त पडिक्कलची अर्धशतकी, तर कर्णधार संजू सॅमसनची 46 धावांची आक्रमक फलंदाजी यांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या लढतीत 20 षटकांत 2 बाद 222 असा धावांचा डोंगर उभा केला.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकला. राजस्थानच्या बटलर व पडिक्कल या सलामीवीरांनी दिल्लीच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. या जोडीने 155 धावांची दमदार सलामी दिली. दरम्यान, दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली.
पडिक्कल खलिल अहमदच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने आपल्या 54 धावांच्या खेळीत 35 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 2 षटकार फटकावले. तो बाद झाल्यावर आलेल्या कर्णधार संजू सॅमसनने बटलरला सुरेख साथ देताना संघाला द्विशतकी मजल मारून दिली. बटलरने यंदाच्या स्पर्धेतील तिसरे शतक साकार केले. त्याने धावांचा वेग वाढवत नेला. मात्र, अनावश्यक फटका मारताना तो 116 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 65 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 9 षटकारांची आतषबाजी केली.
तिसरे शतक
जोस बटलरने यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करताना तिसरे शतक साकार केले. यंदाच्या स्पर्धेत शुक्रवारच्या सामन्यात त्याने 116 धावांची शतकी खेळी केली ती तब्बल 178.46 या प्रचंड स्ट्राइक रेटने. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 100 धावांची खेळी केली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 103 धावांची खेळी केली होता.
तो परतल्यावर शेमरन हेटमायरने सॅमसनला साथ देत संघाला 20 षटकांत 2 बाद 222 असा धावांचा डोंगर उभारून दिला. सॅमसन मात्र 46 धावांवर नाबाद राहिला. त्याने या खेळीत 19 चेंडूत 5 चौकार व 3 षटकार फटकावले. हेटमायर 1 धावेवर नाबाद राहिला. दिल्लीकडून खलिल अहमद व मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक – राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 2 बाद 222 धावा. (जोस बटलर 116, देवदत्त पडिक्कल 54, संजू सॅमसन नाबाद 46, शेमरन हेटमायर नाबाद 1, मुस्तफिजूर रेहमान 1-43, 1-47).