जयपूर – एक कोटीहून अधिक नागरिकांच्या सूचना घेऊन आम्ही आमचा जाहीरनामा तयार केला आहे. आज राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत कॉंग्रेसच आघाडीवर आहे. आज राजस्थानमध्ये मागासवर्गीय आणि अनुसूचित जातींवर अत्याचार होत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महिलांवरील अत्याचारही याच राज्यात सर्वाधिक आहेत. शिवाय रेकॉर्डब्रेक पेपर लीक प्रकरणही उघड झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला सत्तेवरून दूर करणे आवश्यक असल्याचे मत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे.
राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 साठी भाजपने गुरुवारी आपला वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी नड्डा बोलत होते. नड्डा पुढे म्हणाले की, भाजपचा जाहीरनामा आमच्यासाठी राज्याच्या विकासाचा रोड मॅप आहे. आज राज्यातील महिला, तरुण आणि शेतकरी यांनी कॉंग्रेसला तुच्छ लेखले आहे. याचे कारण म्हणजे कॉंग्रेसची ओळख भ्रष्टाचार हीच आहे. भाजपचा जाहीरनामा “सबका साथ सबका विकास’ या मंत्रावर आधारित आहे.
नड्डा म्हणाले की, केंद्र सरकारने राजस्थानला खूप मदत केली आहे. विशेषत: पायाभूत सुविधांमध्ये केंद्राने राजस्थानमध्ये प्रचंड काम केले आहे. गेल्या 9 वर्षांत केंद्रामुळे राज्यात 23 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना नड्डा असेही म्हणाले की, जर राजस्थानमध्ये आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही परीक्षा पेपर लीक आणि इतर घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करू. कॉंग्रेस सरकारने राजस्थानच्या बहिणी, मुली आणि मातांचा अपमान केला आहे. शिवाय गरीब आणि मागासलेल्या लोकांवर अत्याचार केले आहेत आणि शेतकऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे.