ढाका – बांगलादेशमध्ये पुढील वर्षी 7 जानेवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबिबूल अलवाल यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा द्यावा आणि काळजीवाहू सरकारकरवी निवडणुका घेण्यात याव्यात, या मागणीसाठी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात ए इस्लामीने देशभर आंदोलन सुरू केले असतानाच या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सत्तारुढ आवामी लीगने ही मागणी फेटाळून लावली आहे.
निवडणुका पंतप्रधान शेख हसना यांच्याच नेतृत्वाखाली घेण्यात येतील, असे सरकारने ठामपणे म्हटले आहे. या संदर्भात अमेरिका किंवा अन्य पास्चातय देशांबरोबर चर्चेचा प्रस्ताव देखील सरकारने फेटाळून लावला आहे. निवडणुकांमध्ये अडथळा आणणारा “बीएनुपी’ हा पक्ष म्हणजे दहशतवादी संघटना असल्याचेही आवामी लीगने म्हटले आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून बांगलादेशात झालेल्या राजकीय हिंसाचारामध्ये एका राजकीय नेत्यासह एकूण 5 जण ठार झाले आहेत. “बीएनपी’चे सरचिटणीस मिर्झा फकरूल इस्लाम आलमगिर यांच्यासहविरोधकांच्या 8 हजार कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
आवामी लीग, बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी आणि जालिय पार्टी या बांगलादेशातील प्रमुख राजकीय पक्षांमधील मतभेद चर्चेद्वारे सामोपचाराने मिटवण्यात यावेत, अशी मागणी अमेरिकेसह सर्व प्रमुख पाश्चात्य देशांनी केली आहे.