Raj Thackeray : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील खास पोस्ट शेअर करत मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषेचा गौरव फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा, असे त्यांनी ट्वीटद्वारे म्हंटल आहे. सोबतच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये तरुण पिढीबाबत देखील भाष्य केले आहे.
राज ठाकरेंची पोस्ट –
“सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या’ खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा,” असे राज ठाकरे यांनी केली.
तरुणांना केले खास आवाहन
“मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात. पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अभ्यास उत्तम आहेच आणि फक्त त्यांचं ज्ञान, माहिती ही जर रंजक पद्धतीने त्यांनी ह्या समाज माध्यमांवर सांगितली तर?” , सोशल मीडियाबाबत देखील त्यांनी यावेळी मुद्दा उपस्थित केला आहे.
सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या’ खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे… pic.twitter.com/3zpi97580z
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2024
“विकिमीडिया फाउंडेशनचं, ‘विकिपीडिया’ तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. ह्याच विकिमिडीया फाउंडेशनच्या ‘विकिसोर्स’, ‘विकीमीडिया कॉमन्स’, ‘विकिव्हॉयेज’, ‘विकिस्पिशिज’ सारख्या आभासी मंचांचा वापर ज्ञान मराठीतून देण्यासाठी करणं सहज शक्य आहे. विकिमिडीया सारख्या आभासी मंचावर तर ध्वनी, चित्रफीत स्वरूपात पण ज्ञान माहिती प्रसारित करणं शक्य आहे. ह्या सगळ्याचा मुक्त आणि प्रभावी वापर व्हायला काहीच हरकत नसावी. (विकिपीडिया हा ‘प्लॅटफॉर्म’ आहे पण त्याला ‘आभासी मंच’ शब्द वापरला आहे, असे पर्यायी शब्द पण प्रचलित व्हायला हवेत.)”
लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वतःला बदलणं आवश्यक
मराठी भाषेचं काय होणार ह्यावर आक्रोश करण्यापेक्षा, लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःला बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या मराठी इन्फ्ल्यूअन्सर्सचा सत्कार केला होता. पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजमाध्यमांवर मराठी ही ज्ञानाची भाषा बनवणाऱ्यांचा सुद्धा योग्य आदर व्हायला हवा. ह्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेईलच ! पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !” राज ठाकरे यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.