Raj Thackeray – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात मनसे महायुतीत सामील होणे, लोकसभेसाठी जागावाटप यासह अनेक मुद्यांवर चर्चा झाली. तसेच यावेळी शहा यांनी राज यांच्यापुढे मनसे शिवसेनेत विलीन करण्याचा आणि शिवसेनेची धुरा सांभाळण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा द न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे तुम्ही खरे वारसदार आहात. त्यामुळे शिवेसनेचे नेतृत्व तुम्हीच करा, असे शहा यावेळी म्हणाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
जर हे खरेच प्रत्यक्षात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना सुटू शकते. या घडामोडीचा शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो असेही या वृत्तात नमूद करण्यात आले. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
विधानसभेत सन्मानकारक जागा व सत्तेत वाटा देऊ – भाजप
भाजप राज ठाकरे यांच्याकडे दिर्घकालीन सहकारी म्हणून पाहत आहे. याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल. त्यामुळे तुम्ही तुमचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करून शिवसेनाप्रमुख व्हा. या निर्णयाचा मोठा राजकीय फायदा तुम्हाला होईल. विशेषतः पक्ष विलीन केल्यानंतर तुम्ही लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागांवर एनडीएचा प्रचार करा. त्यामोबदल्यात तुम्हाला विधानसभेत सन्मानकारक जागा व सत्तेत वाटा दिला जाईल, असे भाजपने आपल्या प्रस्तावात म्हटल्याचेही या इंग्रजी वृत्तपत्रात नमूद केले आहे.
मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्याचा भाजपचा शिंदेंना शब्द –
विशेष म्हणजे या प्रस्तावाची माहिती भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील दिली आहे. तसेच शिवसेना पक्षातील नेते, लोकप्रतिनिधी यांची समजूत काढून या प्रस्तावासाठी त्यांचे मन वळवावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे या प्रस्तावावर नाराज आहेत. शिवसेना राज ठाकरे यांच्या हातात सुपूर्द केल्यास आपले अस्तित्वच संकटात येईल अशी शिंदे यांना भीती आहे. पण भाजप आपल्या प्रस्तावावर ठाम असल्याचे समोर आले आहे. भाजपकडून शिंदे यांना आश्वासन देण्यात आलेय की, लोकसभेचा निकाल काहीही लागला तरी तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले जाईल.
एकनाथ शिंदे हेच आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख – आमदार शहाजी बापू
अमित शहांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडलेला हा प्रस्ताव शिवसेनेच्या शिंदे गट नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. या प्रस्तावाच्या बातमीनंतर शिंदे गटात खळबळ माजली आहे. या प्रस्तावास शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी नापसंती दर्शवत ही गोष्ट मान्य नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आमदार शहाजी बापू यांनीही ही गोष्ट फेटाळून लावली आहे. एकनाथ शिंदे हेच आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. आम्हाला या प्रकरणी कोणतीही तडजोड मान्य नाही, असे त्यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.
राज ठाकरे यांच्याकडे शिवसेना सोपवण्याची गरज काय ?
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेतले. एकनाथ शिंदे यांच्याकडे ते सोपवण्यात आले मात्र भाजपला राज ठाकरे यांची गरज का भासत आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, शिंदे यांचा भाजपला पाहिजे तसा फायदा होत नसल्याचे दिसत आहे. पक्ष आणि पक्षचिन्ह घेतले तरी शिवसैनिक, सर्वसामान्य मतदार अजूनही ठाकरेंसोबतच असल्याचे भाजपला वाटते. कारण ठाकरे नावात जी जादू आहे ती शिंदे यांच्याकडे जाणवत नाही. भाजपला फक्त पक्षच नव्हे तर ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत हवेत. जर राज ठाकरे भाजपसोबत आले आणि शिवसेनेची धुरा राज यांच्याकडे दिली तर भाजपला याचा मोठा फायदा होईल असे वाटते. कारण शिवसेना म्हंटलं की बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यांचे राजकीय वारसदार योग्य राहतील असे भाजपला वाटते. शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून भाजपला शिंदे यांच्याऐवजी राज ठाकरे योग्य वाटत आहेत. याबाबत पुढे काय घडामोडी घडतात हे येत्या काळात पाहणे महत्वाचे आहे.