पिंपरीचिंचवड : राज ठाकरे यांच्या सभेनंतर युतीमध्ये अस्वस्थता

लोकसभेचा आखाडा : पुराव्यासह केलेल्या पोलखेलची रंगली चर्चा; पिंपरी-चिंचवडमध्ये होणार सभा

पिंपरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडव्या महूर्तावर घेतलेल्या सभेचीच चर्चा आज शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. ठाकरे यांनी मोदी सरकारची पुराव्यानिशी केलेली पोलखेला हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच राज ठाकरे यांची पिंपरी-चिंचवड शहरात सभा होणार असल्याची चर्चा रंगल्याने युतीच्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते मात्र लोकसभेसंदर्भात आपण गुढीपाढव्याच्या सभेत भूमिका जाहीर करून असे स्पष्ट केले होते. शनिवारी झालेल्या पाडव्याच्या सभेत मोदी विरोधी भूमिका ठाकरे यांनी जाहीर केली. ही भूमिका जाहीर करताना राज्यात सभा घेणार असल्याचेही जाहीर केले. मुंबईतील सभे दरम्यान मोदी-शहा यांच्यावर केलेली टीका, एनडीएने केलेल्या खोट्या जाहीराती, नोटबंदीचे परिणाम, बेराजगारी, सैन्याची कारवाई यासह अनेक मुद्यांना स्पर्श करत जनतेच्या भावनाऱ्या बाबी समोर मांडल्याची चर्चा आज शहरात रंगली होती.

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदासंघात मनसेचे साठ हजारांहून अधिक हक्काचे मतदान असल्याचे सांगण्यात येते. राज ठाकरे यांनी गतवेळी युतीला मदत केल्याने हे मतदान गतवेळी शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात पडले होते. गतवेळी मोदी लाट असल्याने ठाकरे यांचा पाठींबा तितकासा उल्लेखनिय ठरला नव्हता. यावेळी मात्र वेगळी परिस्थिती आहे. ओसरलेली मोदी लाट, सत्ताधाऱ्यांविरोधातील जनमत आणि त्यातच राज ठाकरे यांनी घेतलेली मोदी-शहा विरोधी भूमिका यामुळे मावळ आणि शिरुरच्या सेना उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पुढील दहा ते पंधरा दिवसांत राज ठाकरे यांची शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एक जाहीर सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील मनसेच्या हक्काची मते युती विरोधी पक्षांतील उमेदवारांना गेल्यास त्याचा फटका बसणार आहे. सध्या मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती होत आहेत. मनसेने घेतलेली विरोधी भूमिका, शहरात होवू घातलेली ठाकरे यांची सभा आणि गतवेळी हक्काची ठरलेली मते विरोधात जाणार असल्याने युतीचे उमेदवार याला तोंड कसे देतात ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीची पराभूत मानसिकता?

राज ठाकरे यांनी पुराव्यानिशी शनिवारी भाजप सरकारची आणि मोदी यांची जी पोलखोल केली ही खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने करणे अपेक्षित होते. मात्र हे दोन्ही विरोधी पक्ष केवळ पोपटपंची करण्यातच व्यस्त असल्याची टीका आज राजकीय वर्तुळातून करण्यात आली. कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची भाजपा विरोधात लढताना मानसिकताच पराभूत झाली की काय? असाही प्रश्‍न आज अनेकांनी उपस्थित केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.