पुणे – संविधान टिकावं असे राज ठाकरे यांना वाटत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे बारामतीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. येथील बारामती लोकसभा मतदार संघाच्या मोर्चेबांधणीची जबाबदारी मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कार्यालयाच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार करावा, असे म्हंटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, संविधान टिकावे असे ज्या पक्षाचे मत असेल त्या पक्षाने भाजपला सहकार्य करू नये. भाजप पक्ष आज ज्या पद्धतीने काम करत आहे ते संविधानविरोधी आहे. राज ठाकरे यांना वाटत असेल की संविधान टिकावे तर त्यांनी कुठेतरी विचार करून महाविकास आघाडीबरोबर येण्याचा विचार केला पाहिजे. पण आपले उमेदवार उभे करून त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपलाच फायदा होत असले तर त्यांनी विचार करावा आणि खऱ्या अर्थाने आपण कोणत्या बाजूला आहोत ते त्यांनी पहावे.
मतं फोडण्यामुळे भाजपला फायदा –
रोहित पवार म्हणाले की, मी केवळ एक आमदार आहे. त्यामुळे मी राज ठाकरे यांना महाविकास आघाढीत येण्याचे आवाहन करू शकत नाही. पण नागरिक म्हणून माझं एकच म्हणणं आहे की, जे पक्ष मतं फोडतात त्यांच्या या मत फोडण्यामुळे भाजपला फायदा होतो. अशा प्रकारचं चित्र याआधीही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी विचार करावा. भाजपला मदत करायची की संविधानाला मदत करायची हे राज ठाकरे यांनी ठरवावे. संविधान टिकवण्यासाठी मदत करायची असेल तर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, इंडिया आघाडीबरोबर यावं, असे रोहित पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटले आहे.