मुंबई – राज्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून मुंबई ठाण्यासह कोकणात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. या ठिकाणी पुढील काही दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणात दि. 7 ते दि. 9 जुलै दरम्यान अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे येत्या 6 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर मुंबई आणि ठाणे उपनगरांत सर्वाधिक पाऊस पडणार आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. दुसरीकडे दडी मारून बसलेल्या पावसाने तब्बाल सव्वा महिन्यानंतर परभणी शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. परभणी शहरासह जिल्ह्यात मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.