Rain Update : आज पासून नवीन वर्षाची सुरुवात होत असून, वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणारी ठरली आहे. मागील वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळीचे संकट आहे.
नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. त्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज दिल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
पुणे परिसर आणि कोकणात बुधवारपासून पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणामामुळे हा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचे सावट असणार आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून थंडी कमी झाली आहे.
पुणे शहरात तापमान वाढले आहे. पुण्यात रविवारी तापमानात १.७ अंशाने वाढ झाली. पुणे शहराचे तापमान १२.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. वातावरणातील या बदलाचा शेतीला फटका बसणार आहे.
थंडी कमी झाल्याचा परिणाम रब्बी पिकावर होणार आहे. सध्या थंडी कमी झाली असली तरी धुके निर्माण होत आहे. यामुळे पिकांना कडक ऊन मिळत नाही आणि पिकांचे नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘या’ भागात पावसाची शक्यता…
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या देशातील बहुतेक भागात कडाक्याची थंडी सुरू आहे. पहाटेच्या धुक्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे.