पुणे – रेल्वेने मार्चपासून विविध वस्तूंची वाहतूक करण्यात येत आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेने लाखो टन वस्तूंची वाहतूक केली असून, पुणे विभागातून पहिल्यांदाच बांग्लादेशला चारचाकी वाहने पाठवली असून, चिंचवड स्थानकातून व्हॅन बांग्लादेशच्या बेनापोलकडे रवाना झाल्या.
करोना पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मालवाहतुकीवर भर देण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या विभागांतून अन्नधान्य, औषधे, सिमेंट आदी विविध गोष्टींची वाहतूक सुरू आहे. पुणे विभागातून यापूर्वीदेखील साखर, तेल उत्पादनांसह विविध वस्तुंची वाहतूक झाली. मात्र, पहिल्यांदाच पुणे विभागाच्या वतीने बांग्लादेशला चारचाकी वाहनांची वाहतूक केली आहे.
रेल्वेच्या व्यवसाय विकास विभागाच्या (बिझनेस डेव्हलपमेंट युनिट) मदतीने नवीन व्यवसाय मिळवण्यात यशस्वी होत आहे. जलद वाहतूक परिवहन, वाजवी दर आणि सुरक्षित संचालन आदी वैशिष्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले उत्पादन रेल्वेमार्गे बांग्लादेशला पाठवले आहे. यांतर्गत पहिल्या खेपेत चिंचवड रेल्वे स्थानकातून 75 पिकअप व्हॅन 2 हजार 139 किमी अंतरावरील बांग्लादेशच्या बेनापोल येथे रवाना झाल्या.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर मंडल रेल प्रबंधक सहर्ष वाजपेयी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील निला यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य आणि परिचालन विभागाद्वारे ही वाहतूक करण्यात आली, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.