रायगड : गीते आव्हान पेलतील?

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आमने सामने आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांनी तटकरेंचा अवघ्या 2 हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी आपण जिंकूच असा विश्‍वास तटकरेंना आहे. आमदार भास्कर जाधव यांच्याबरोबरचा वाद त्यांनी मिटवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेसही त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्याबद्दल त्यांना आत्मविश्‍वास आहे. शिवसेनेचे गीते केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते, याचा फायदा त्यांना मिळेल असेही बोलले जात आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघ लक्षणीय आहे. एक तर हा मतदारसंघ अतिशय चाणाक्ष म्हणून ओळखला जातो. कोणत्याही लाटेवर स्वार न होणारा हा मतदारसंघ आहे. सुरूवातीला कॉंग्रेस आणि नंतर शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जात होता. यावेळी शेकाप कॉंग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी कॉंग्रेसची मते गीतेंना मिळण्याची शक्‍यता आहे. भाजपची मतेही निर्णायक आहेत.

अनंत गीते सतत सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. साहजिकच त्यांच्या विरोधातही एक गट आहे. आता सातव्यांदा निवडून यायचे तर या अंतर्गत गटबाजीवर मात करण्याचे आव्हान गीते यांच्यासमोर आहे. भाजपशीही सलोखा वाढवण्याची गरज आहे. शिवाय आपल्या नाराज कार्यकर्ते, मतदार यांना बरोबर घेण्याचे आव्हानही गीते यांना पेलावे लागणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील दोन विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. पेण, अलिबाग, श्रीवर्धन, दापोली, गुहागर आणि महाड हे सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात. त्यातील दापोली आणि गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. पेण आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघ शेकापकडे, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर महाड मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.

गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि शेकाप अशी तिरंगी लढत झाली होती. पण यावेळी शेकाप कॉंग्रेस आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे तटकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाल्याने यावेळी कॉंग्रेस आघाडीने मतांचे विभाजन होणार नाही याची काळजी घेतली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेकडे अवघा एक मतदारसंघ आहे. पण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने 2009 पासून आपल्याकडे राखला आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

कॉंग्रेसची या मतदारसंघात नाही म्हटले तरी दीड ते दोन लाख मते आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे असावा असे कॉंग्रेसला वाटत होते. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला असून त्यामुळे येथे फरक पडेल अशी शंका राजकीय तज्ज्ञांना येत आहे. कारण कॉंग्रेसचे कार्यकर्ते तटकरेंना सहकार्य करतील का हा प्रश्‍न विचारला जात आहे. एका बाजूला कॉंग्रेसबरोबर संबंध सुरळीत करण्याचे आव्हान तटकरेंसमोर आहे तर दुसऱ्या बाजूला घराणेशाहीचा प्रभाव कमी कसा करायचा हा प्रश्‍नही त्यांना सतावत आहे. तटकरे यांच्या घरातच तीन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांच्या घराणेशाहीला कंटाळून रायगड जिल्ह्यातील त्यांचे अनेक जवळचे सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवसेनेत सहभागी झाले आहेत. तटकरे यांना भाऊबंदकीचा त्रासही होत आहे.

या मतदारसंघातून तटकरे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध होता. तटकरे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले आहेत. त्याचा कितपत नकारात्मक परिणाम तटकरेंना सोसावा लागतो हे पहावे लागेल. तटकरे यांनी खुबीने आपल्याला होणाऱ्या पक्षांतर्गत विरोधावर मात केली आहे. शेकाप त्यांच्याबरोबर आहेच. आता कॉंग्रेसची साथ व्यवस्थित मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

शिवसेनेचे अनंत गीते हे केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री आहेत. त्यांची प्रतिमा चांगली आणि स्वच्छ आहे. पण मंत्री म्हणून ते स्वत:ची वेगळी छाप पाडू शकलेले नाहीत. खासदार निधीतून त्यांनी कामे केली आहेत. पण भरीव कामगिरी काही नाही. या मतदारसंघात कुणबी मतांची संख्या जास्त आहे. स्वत: गीते कुणबी समाजाचे आहेत. दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघांतील कुणबी मते रायगड लोकसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. अर्थात गीते यांना या मुद्द्यावर फारसे अवलंबून राहता येणार नाही. कारण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत.

चिपळूण तालुक्‍यातील 72 गावे रायगड लोकसभा मतदारसंघाला जोडली आहेत. तेथे जिल्हा परिषद, पंचायत समितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे बळ समान आहे. त्यामुळे गीते यांना ज्याप्रमाणे त्यांच्या समाजाची मते निर्णायकपणे मिळत असत, तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. खेड तालुक्‍यात शिवसेनेचा मोठा प्रभाव आहे. कारण येथे रामदास कदम यांचे वर्चस्व आहे. पेणमध्ये कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री रवी पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आहे ही बाब गीतेंना दिलासा देणारी आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची होणार आहे. आणि म्हणूनच रंगतदार ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.