पैशासाठी बापाचा खून

भांडणे सोडविणाऱ्या आईलाही केली मारहाण
न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची कोठडी
तारगाव येथील घटना : निर्दयी मुलास अटक

रहिमतपूर – तारगाव येथे पैशाच्या कारणावरून युवकाने आईच्या समोरच वडिलांच्या छातीत लाथाबुक्‍क्‍या घालून खून केला. याप्रकरणी आबाजी लक्ष्मण मोरे (वय 30) यास पोलिसांनी अटक अटक केली असून त्यास न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयीत गेली दोन वर्षे आई-वडिलांना मारहाण करत असल्याची माहिती मिळत असून तशी फिर्यादही त्याच्याविरोधात दाखल झाली होती.

याबाबत पोलिस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तारगाव येथील लक्ष्मण हणमंत मोरे, पत्नी मंगल लक्ष्मण मोरे व मुलगा आबाजी समवेत तारगांव स्टेशन जवळील शेतात ज्वारी मळण्यासाठी गेले होते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ज्वारी मळायचे काम सुरू होते. ज्वारी मळल्यानंतर ज्वारीचे एक पोते विकून पैसे मी घेणार असे म्हणत आबाजी ज्वारीचे एक पोते घेऊन निघाला होता. त्यास वडील लक्ष्मण मोरे यांनी विरोध केला. यावरून आबाजीने वडिलांना मारहाण करायला सुरवात केली. यावेळी आई मंगल यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता आबाजीने आईचा गळा पकडून ढकलून दिले व वडिलांना मारत, फरफटत शेजारील वांग्याच्या शेतात नेले. त्याठिकाणी त्यांच्या छातीवर बसून लाथा-बुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. तसेच गळा दाबू लागला.

आई मंगल यांनी ही घटना रस्त्यावरून घरी निघालेल्या शाशिकांत गुरव यांना सांगितली. शशिकांत गुरव यांनी घरी जाऊन शेजारील राजेंद्र मोरे व इतर ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली परंतु, लक्ष्मण यांचा मारहाणीत जाग्यावरच मृत्यू झाला होता. याबाबत मंगल मोरे यांनी रहिमतपूर पोलिसात मुलगा आबाजी याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानंतर रहिमतपूर पोलिस स्टेशनचे सपोनि घनशाम बल्लाळ यांनी तातडीने कारवाई करत संशयीतास आबाजीला रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान रेल्वे स्टेशनवरुन अटक केली. त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. तपास सपोनि घनशाम बल्लाळ हे करत आहेत. दरम्यान, आबाजी गेली दोन वर्ष घरी आई-वडीलांना जबर मारहाण करीत होता. यावरून त्याच्या आईने रहिमतपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यावेळी पोलिसांनी आबाजीवर कारवाई केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.