शरद पवारांकडूनही राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याचा सल्ला

दिल्ली – लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर प्रथमच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला मोठा पराभव आला असून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा केवळ १ खासदार निवडून आला आहे.

तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणीकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता मात्र काँग्रेस कार्यकारणीने त्यांचा राजीनामा एकमुखाने नाकारत काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच सर्वोत्तम नेते असल्याचं म्हंटल होतं. मात्र राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर अद्याप ठाम आहेत.

अशातच आज राष्ट्रपती भवनामध्ये नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील आपली आई सोनिया गांधी यांच्यासह शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीदरम्यान दोन नेत्यांनी जवळपास एक तासभर चर्चा केली. या बैठकीमध्ये देशातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा केल्याचे वृत्त असून शरद पवार यांनी यावेळी राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये असा सल्ला दिल्याची माहिती मिळावी आहे. मात्र या बैठकीबाबतची सविस्तर माहिती अद्याप समजू शकली नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.