टाकळी ढोकेश्वर -लॉकडाऊनमुळे पारनेर पोलिसांनी आपला मोर्चा गावठी दारू अड्ड्यांकडे वळवला आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी मांडवे खुर्द व वारणवाडी येथील गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून साडेपाच हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली.
याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सूरज दिलीप कदम यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार संतोष ऊर्फ वाल्मीक पोपट बिडकर (रा. मांडवे खुर्द, ता. पारनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मांडवे गावच्या शिवारात शासकीय विश्रामगृह पाठीमागील लिंबाच्या झाडाखाली गावठी दारू विक्री करत असताना त्यास अटक करण्यात आली. यावेळी साडेचार हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
दुसरीकडे 29 एप्रिल रोजी सायंकाळी वारणवाडीत 780 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. यावेळी सुनील अर्जुन कोकाटे (रा. वारणवाडी, ता. पारनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी 780 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. अधिक तपास सहायक फौजदार जी. एन. फसले व पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिदास शेलार, सूरज कदम करत आहेत.