सातारा, (प्रतिनिधी) – वाढे फाटा, ता. सातारा येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून, पोलिसांनी 18 हजार 366 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. याबाबत माहिती अशी, वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेलशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अमित बजरंग करे, अमितकुमार विश्रांत माने (रा. वाढे), श्रीकांत लक्ष्मण पाटील, सुभाष शिवाजी शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा), नारायण किसन कदम (रा. खेड) व धनंजय चंद्रमणी आगाने (रा. कोडोली, ता. सातारा) हे काल (दि. 5) दुपारी 3.55 च्या सुमारास जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा
सातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून, पोलिसांनी दहा हजार 660 रुपये रोख रक्कम, पीसी बोर्ड व एलईडी टीव्ही जप्त केला. याबाबत माहिती अशी, शहरातील तुळजाभवानी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधील मोकळ्या जागेत अमोल कृष्णात उबाळे (रा. कमानी हौद परिसर, सातारा) हा सोमवारी (दि. 4) जुगार घेताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून दहा हजार 660 रुपये रोख रक्कम, पीसी बोर्ड व एलईडी टीव्ही जप्त केला.
अपघातप्रकरणी एकावर गुन्हा
सातारा,(प्रतिनिधी) – दोन दुचाकींच्या अपघातात विवेकानंद अनिल लावंड (रा. बालेवाडी, पुणे) हे जखमी झाले. याप्रकरणी अमर हुसेन शेख (रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, विवेकानंद लावंड हे दुचाकी (एमएच-11-डीके-9576) वरून राधिका चौक ते बसस्थानक मार्गावर सोमवारी (दि. 4) निघाले होते.
ते विराट इंटरप्राइजसमोरून दुचाकी वळवत असताना, बसस्थानकाकडून आलेल्या भरधाव दुचाकी (एमएच-11-सीसी-0263) ने लावंड यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात लावंड हे जखमी झाले. याप्रकरणी दुसर्या दुचाकीवरील अमर शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
घाटाई मंदिरातून 20 हजारांची चोरी
सातारा (प्रतिनिधी) – घाटवण, ता. सातारा येथील घाटाई मंदिरातून 20 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, सोमवार, दि. 4 ते मंगळवार, दि. 5 या कालावधीत घाटाई मंदिरातील पितळी घंटा, पितळी समई, वाघ व देवीची मूर्ती, स्टीलची ताटे, हॅलोजन, एलईडी आणि दानपेटीतील 17 हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सोमनाथ राजाराम जाधव (रा. अटाळी, ता. सातारा) यांनी दिली आहे.
आसगाव येथील एकाचा मृत्यू
सातारा, (प्रतिनिधी) – रमेश नामदेव शिंदे (वय 39, रा. आसगाव, ता. सातारा) हे काल (दि. 5) एका वाहनात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबतची खबर चंद्रकांत शंकर शिंदे (रा. आसगाव) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.