पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून संदेश पाठविण्यात आला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष तरुणाला दाखविण्यात आले होते. तरुणाने संदेशातील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.
तेव्हा सायबर चोरट्यांनी त्याला एक लिंक उघडण्यास सांगितले. शेअर बाजारातील व्यवहारांसाठी बँकेत खाते उघडावे लागेल, असे सांगण्यात आले. तरुणाकडून वेळोवेळी आठ लाख ५५ हजार रुपये चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात जमा करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर तपास करत आहेत.