राहुरी – राहुरी व परिसरात अवकाळी पावसाने सायंकाळी पाचच्या सुमारास हजेरी लावली. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक होता. तीव्रतेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वस्तिक चौक (डॉक्टर भळगट हॉस्पिटल) जवळ दोन महाकाय वृक्ष उन्मळून पडले.
एक सुबाभळ आणि एक ग्रीन ट्री नावाची ही सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वीची वृक्ष उन्मळून पडल्याने समोरील तीन ते चार व्यापारी गाळ्यांचे मोठे नुकसान झाले. राहुरी कॉलेज जवळील शेटे नामक व्यक्तीची स्कुटीचे नुकसान झाले. सुदैवाने पावसामुळे रस्त्यावर कोणतीही वर्दळ नसल्याने जीवित हानी मात्र टळली. घटना समजताच राहुरी नगरपालिकेचे आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. वृक्ष विजेच्या तारावर पडल्याने राहुरी शहराचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वृक्ष हटवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
राहुरी तहसीलदार कार्यालयातील आपत्कालीन कक्षाकडे संबंधित माहिती देण्यात आली आहे. नगर- मनमाड महामार्गावर वृक्ष पडले. राहुरी महाविद्यालयाजवळ दोन झाडे पडली.एक मालवाहू ट्रक रस्ता सोडून खड्ड्यात गेला. महामार्गावरील वाहतूक अंशतः विस्कळीत झाली. त्रिमूर्ती क्रेन सर्व्हिस सेंटरचे पीओपी वादळात उडून गेले. रस्त्यावरील अनेक नामफलक व अनेक वस्तू जोरदार वाऱ्याने उडून गेल्या. पावसात नव्या पेठेमध्ये पाणीच पाणी झाले होते. तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव आदी परिसरातही पावसाने हजेरी लावली.
या अवकाळी पावसाने या हंगामातील कांदा पिकाचे मात्र नुकसान होणार आहे. अन्य पिके ऊस व चारा पिकांसाठी मात्र हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो. अचानक आलेल्या पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने नागरिकांची एकच धावपळ झाली. सखल भागातील झोपडपट्टीत पावसाचे पाणी साचले होते. आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते आहे.