नवी दिल्ली :- न्युज क्लिक या वेबपोर्टलला भारत विरोधी प्रचार करण्यासाठी चिनकडून निधी दिला जात असल्याचा आरोप आज न्युयॉर्क टाईम्समध्ये आलेल्या बातमीच्या आधारे भाजपने केला आहे. या न्युज पोर्टलवरील बातम्यांना कॉंग्रेस व अन्य पक्ष पाठिंबा देत असतात असा आरोप करून भाजप नेते आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांच्या बनावट मोहब्बत की दुकान मध्ये चिनी बनावटीचा माल विकला जातो असा उपहासही त्यांनी केला. ठाकुर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हेही उपस्थित होते.
अनुराग ठाकूर म्हणाले की न्युज क्लिकचे फंडिंग नेटवर्क पाहिल्यास, त्याला नेव्हिल रॉय सिंघम या परदेशी व्यक्तीने निधी दिला होता आणि या सिंघमला चीनकडून निधी मिळतो. या नेव्हिल रॉय सिंघमचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचार शाखा आणि माकू ग्रुप या चिनी मीडिया कंपनीशी थेट संपर्क आहे. ते मोफत बातम्यांच्या नावाखाली खोट्या बातम्या देतात. कॉंग्रेस आणि इतर पक्ष त्यांच्या बातम्यांना पाठिंबा देत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
भाजपचे सदस्य निशिकांत दुबे यांनी लोकसभेत न्यू यॉर्क टाईम्समधील बातमीचा मुद्दा उपस्थित केला होता ज्यात दावा केला होता की न्यूजक्लिकला चिनी कंपन्यांकडून निधी मिळाला आहे आणि हा पैसा भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी वापरला गेला आहे. त्यावरून संसदेत भाजप सदस्यांनी आज जोरदार हल्लाबोल करीत गदारोळ माजवला होता. त्यामुळे कामकाज लगेच तहकुब करावे लागले.