नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ ज्या दिवशीपासून सुरु झाली तेंव्हा पासून त्यांनी अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला पाहायला मिळला. त्यावरून त्यांना प्रश्न देखील विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी वेळ आल्यानंतर जॅकेट परिधान करेल असे म्हटले होते. दरम्यान, ती वेळ आता ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर आल्याची दिसत आहे. कारण आज सकाळी कठुआपासून यात्रेला सुरुवात झाल्यानंतर थंडीपासून वाचण्यासाठी राहुल गांधी जॅकेट घालून चालताना दिसले.
आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हेदेखील ठरल्याप्रमाणे या यात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी गळ्यात भगवी मफलर घालून यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती.
LIVE: #BharatJodoYatra | Hatli Morh Chowk to Channi | Kathua | Jammu and Kashmir https://t.co/QjKRTmBZr0
— Bharat Jodo (@bharatjodo) January 20, 2023
मागचे चार महिने कन्याकुमारीपासून दक्षिणेतली राज्य पायी चालत राहुल गांधी उत्तरेत पोहोचले. या चारही महिन्यात भारताच्या विविध भागांमध्ये तापमानात चढउतार होते. तरीही राहुल गांधी यांनी पांढरा टी-शर्ट हा आपला स्टाईल आयकॉन केला होता. दिल्लीत ‘भारत जोडो यात्रा’ आली असताना ७ डिग्री अंश सेल्सियसमध्येही ते एका टी-शर्टवरच दिसले होते.
राहुल गांधीच्या टी-शर्टची चर्चा सोशल मीडियावरही बरीच रंगली. सुरुवातील भाजपाने आपल्या सोशल मीडियावर या टी-शर्टची किंमत ४० हजारांच्या पुढे असल्याचे सांगत बरबरी ब्रँडचे टी-शर्ट राहुल गांधी वापरतात, अशी पोस्ट टाकली. या पोस्टवर जवळपास लाखाहून अधिक कमेंट आल्या. युजर्सनी नरेंद्र मोदी यांच्या दहा लाखांच्या सुटवरुन भाजपाला प्रश्न विचारले आणि ट्रोल केले. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये यात्रा पोहोचल्यानंतर भाजपाच्यावतीने पुन्हा एकदा टी-शर्टला टार्गेट करण्यात आले होते.