बागलकोट (उत्तर कर्नाटक) – कर्नाटक निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही रविवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर बागलकोट गाठले. येथे राहुल गांधी यांनी संगमनाथ मंदिर आणि कुडलसंगम मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. राहुल गांधी यांच्या संगमनाथ मंदिर आणि कुडलसंगम मंदिराच्या भेटीकडे लिंगायत समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
राहुल गांधी दिल्लीहून कर्नाटकातील हुबळी येथे पोहोचले आणि त्यानंतर हुबळीहून हेलिकॉप्टरने कुडलसंगम आणि संगमनाथ मंदिरात पोहोचले आणि तेथे भेट दिली. बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा नदी आणि मळप्रभेच्या संगमावर असलेले कुडलसंगम हे लिंगायत समाजाचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. कुडलसंगममध्ये महात्मा बसवेश्वरांची समाधी आहे, ज्यांना लिंगायत समाजाचे महान गुरु आणि लिंगायत समाजाचे संस्थापक बसवण्णा म्हणूनही ओळखले जाते.
बसव जयंती कार्यक्रमात राहुल गांधीही सहभागी झाले होते. कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्या या साऱ्या कसरतीकडे लिंगायत समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील लिंगायत समाज हा राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के आहे आणि कर्नाटकच्या राजकारणात त्यांना खूप महत्त्व आहे.
यामुळेच सर्व राजकीय पक्ष लिंगायत समाजाला आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न करत आहेत. साधारणपणे कर्नाटकातील लिंगायत व्होटबॅंक ही भाजप समर्थक मानली जाते, मात्र यावेळी भाजपच्या या व्होटबॅंकेला खीळ घालण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे.